प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 65 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत, या संशयितांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे 1 आणि पोलीस स्टेशनचे 2 पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेनंतर 2 अट्रोसिटीचे गुन्हे दाखल असून 15 ते 20 आरोपींचा समावेश आहे, त्यापैकी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती डीवायएसपी सचिन हिरे यांनी दिली आहे.धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी बॅनर फाडल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादा नंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर गावात गेल्या दोन दिवसांपासून कडीकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून आजही हा बंदोबस्त कायम असून येथील व्यवसायिकांनी दोन दिवसांपासून बंद ठेवलेली दुकाने आज काही प्रमाणात सुरू केली आहेत. यामुळे पोलीस बंदोबस्त कायम असला तरी जनजीवन मात्र हळूहळू पूर्व पदावर येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच गावात शांतता असून पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
