प्रतिनिधी , वर्धा : वर्ध्यातील सेवाग्राम येथे तयार केलेल्या गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांच्या अर्धाकृती मूर्ती दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहेत. गांधीजींच्या विचारांचा प्रसार व्हावा, या करिता जय जगत हा नारा घेवून कार्य करणारे जालंधरभाई या मूर्ती तयार करत आहेत. लवकरच १०० मूर्ती दक्षिण आफ्रिकेत नेण्यात येणार आहेत. फायबर मटेरियलपासून या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. जय जगत वर्ल्ड पीस ग्रुपचे सदस्य जगातील वेगवेगळ्या देशात भ्रमंती करतात. गांधीजींना मानणारी मंडळी यातून गांधीजींच्या विचाराचा प्रचार, प्रसार करण्याचं काम करते. टॉलस्टॉय फार्ममध्ये रचनात्मक काम केली जाणार आहे. त्या निमित्तानं तेथील संचालकांनी महात्मा गांधींजी आणि नेल्सन मंडेला यांच्या मूर्ती मागविल्या. सेवाग्राम आश्रमामध्ये राहणारे जालंधर भाई सध्या या मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. गांधीजींच्या ५० आणि मंडेला यांच्या ५० अशा १०० मूर्ती दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहेत. जवळपास तीन महिन्यांचा कालावधी मूर्ती बनवण्यास लागला आहे. गांधीजींच्या विचाराचा प्रचार प्रसार करताना २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिकेत टॉलस्टॉय फार्मची स्थापना गांधीजींनी 1910 मध्ये केली होती. ही जागा जोहान्सबर्ग पासून 21 किलोमीटर दूर 1100 एकर मध्ये आहे. ही जागा हरमन कालेनबाख यांनी भेट दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील टॉलस्टॉय फार्ममध्ये गांधीजींच्या मूर्ती ठेवल्या असता तेथे १०० मूर्ती नेण्यात येणार आहेत. ३० जानेवारीला आयोजित कार्यक्रमात या मूर्ती तेथे वितरीत करण्यात येणार असल्याचं जालंधर यांनी सांगितल.
