जनतेज न्युज

शिक्षणासाठी रोज 21 कि.मी. ची पायपीट, अंबाई धनगर वाड्याच्या विद्यार्थ्यांची शोकांतिका

प्रतिनिधी, सांगली : उखळू पैकी अंबाई धनगर वाडा तालुका शाहूवाडी येथील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या साधनाचा अभावामुळे रोजच्या शिक्षणासाठी सुमारे 21 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. एकीकडे देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील पश्चिम भागातील अंबाई धनगरवाडा येथील विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणासाठी चार तास दप्तराच ओझं पाठीवर घेऊन चालावे लागते ही शोकांतिका आहे..
अंबाई धनगरवाडा येथे पहिली ते पाचवी पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. परंतु माध्यमिक शिक्षणासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असणाऱ्या वारणावती तसेच हुतात्मा नगर येथे सुमारे साडेदहा किलोमीटर अंतरावर यावे- जावे लागत आहे. अंबाई धनगरवाडा येथील माध्यमिक शिक्षण घेणारे सुमारे 30 विद्यार्थी आहेत अंबाई धनगरवाड्यात तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण झाले या रस्त्याने अजूनही लाल परी म्हणजे एसटी पाहिलेली नाही उखळू या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर अंबाईचा धनगर वाडा आहे स्वभोवताली घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये वन्य प्राण्याच्या भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या समाज बांधवांच्या वाट्याला अगोदरच असलेले 18 विश्व दारिद्र्य अशातच मुलांच्या शिक्षणाची ही वाट खडतर असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी होणारा संघर्ष संपणार तरी कधी? असा सवाल पालक वर्गातून होत आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने अंबाई धनगर वाड्याच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करून लाल परी इथेपर्यंत पोहोचवावी अशी मागणी ग्रामस्थ पालक वर्ग करीत आहेत.त्यांच्या प्रयत्नाला यश ही आले त्यामुळे नुकतीच परिवहन महामंडळाने या मार्गावर एसटीची चाचणी ही घेतली मात्र ती अरुंद रस्ता तसेच तीव्र वळण असल्यामुळे अयशस्वी ठरली त्यामुळे आता अजून किती दिवस या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे ग्रामस्थांनी या मार्गावर मिनीबस चालू करण्याची आता मागणी केली आहे. याला शासन तसेच प्रशासन कधी साद घालणार हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.