प्रतिनिधी, बीड : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमध्ये आयोजित शिवगर्जना संवादच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. बीड मधील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात या शिवगर्जना संवादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिकांशी संवाद करून त्यांच्या अडचणी दानवे यांनी जाणून घेतल्या आहेत. दरम्यान यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी कमळाबाईच्या दावणीला स्वतःला बांधलं असं म्हणायचं का? असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला. तर यांच्यासारखे दिल्लीच्या पातशाहीचे तळवे कधी चाटले नाही. आजच्या घडीला हे चाटत आहेत. धनुष्यबाण उचलण्यासाठी मोठी ताकद लागते, मोठे विचार लागतात. त्यासाठी दिल्ली वाल्यांची चाकरी करावी लागत नाही. जो कोणी चाखरी करेल त्याला धनुष्यबाण उचलणं सोपं नाही असे देखील दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे. तर अशोक चव्हाण स्वतःला असुरक्षित समजतात सातव यांच्यावर दिवसाढवळा हल्ला होतोय. संजय राऊत यांच्या बद्दल देखील कट रचला जातोय. तर पोलीस सत्ताधाऱ्यांची बटीक होऊ पाहतेय. असा निशाणा दानवे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे/फडणवीस सरकारवर साधला आहे.
